ठाणे : महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये हालाचालींना वेग आला आहे. आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले. या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
‘मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे हा चेहरा शरद पवारांच्या मनात नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याबद्दल आव्हाड यांना विचारले असता आव्हाड म्हणाले की, “शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोला समजत नाही. हे देवेंद्र फडणवीस यांना काय समजणार आहे. ते शरद पवार आहे, गेल्या ७० वर्षांमध्ये त्यांच्या मनात काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती नसते तर देवेंद्र फडणवीस यांना काय माहिती असणार, ते शरद पवार, हे लक्षात ठेवा’ असं म्हणत आव्हाडांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर काय म्हणाले?
“गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. आज गणरायाचं आगमन झालं आहे. त्यानंतर दहा दिवस मोठी गर्दी असते. त्यामुळे आज दर्शन घेण्यासाठी आलो. मुख्यमंत्री शिंदे यांची गाडी येताना पाहिली होती. त्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. गणरायाचं दर्शन घेतलं. त्यांना शुभेच्छा दिल्यात. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा कशी होणार? त्यांच्या घरी गर्दी खूप होती. पण कोणतीही अशी राजकीय चर्चा झाली नाही,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.