लखनऊ – भाजप नेते अभिषेक शुक्ला यांनी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना लखनऊ येथील सुशांत गोल्फ सिटी परिसरातील नंदिनी अपार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची दाखल होऊन पाहणी केली आहे. पोलिसांना खोलीतून एक सुसाईड नोट सापडली असून पत्नीसोबतच्या वादातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक शुक्ला हे मूळचे गोरखपूरच्या सिंघाडिया येथील आहेत. शुक्ला भाजपचे नेते होते. ते येथील नंदिनी अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होते. सोमवारी सकाळी शुक्ला यांचा मित्र पवन पांडे फ्लॅटच्या एका खोलीत झोपला होता. इतक्यात अचानक गोळीबाराचा आवाज आला, त्यानंतर त्याने ड्रॉईंग रूममध्ये पाहिले असता त्याला अभिषेकचा रक्ताने माखलेला मृतदेह खुर्चीवर पडलेला दिसला. त्यानंतर त्याने पोलिसांना आणि अभिषेकच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मृतदेह खुर्चीला लटकलेला होता. शुक्ला यांच्या घशात गोळी लागली होती. खुर्चीखाली पिस्तुल आणि मोबाईल पडलेला होता. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून पत्नीसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शुक्ला यांची पत्नी कुमुद ओमॅक्स सिटीमध्ये राहते. दोघांमध्ये वाद झाला होता. सुसाईड नोटमध्ये अभिषेकने लिहिले आहे की, तो त्याच्या पत्नीशी झालेल्या वादामुळे अस्वस्थ होता. यामुळेच आत्महत्या करत आहे. घटनास्थळावरून सापडलेली सुसाईड नोट, मोबाईल फोन आणि पुरावे तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात अभिषेकच्या पत्नीशी चौकशी केली जाणार आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.