राजस्थानमध्ये ‘उदयपूर कन्हैयालाल हत्य’ प्रकरण’ अद्याप मिटलेले नाही. भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या बाडमेर जिल्ह्यातील भाजप नेते भुरसिंग राजपुरोहित यांना बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप नेत्याने सोशल मीडियावर दहशतवादाविरोधात पोस्ट केली होती. तेव्हापासून त्याला वेगवेगळ्या फोन नंबरवरून कुटुंबासह जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. धमक्या मिळाल्यानंतर भाजप नेत्याने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी भाजप नेत्याला सुरक्षा पुरवली असून गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुरसिंग राजपुरोहित हे अनेक दिवसांपासून भाजपशी संबंधित आहेत. ते बाडमेर भाजपच्या आयटी सेलचे नियंत्रक आहेत. राजपुरोहित सध्या सोशल मीडियावर भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. भुरसिंग यांनी 1 जून रोजी दहशतवादाविरोधात पोस्ट टाकली होती. यामध्ये भुरसिंग यांनी जिहादी आणि दहशतवादाविरोधात लिखाण केले. तेव्हापासून त्यांना धमकीचे फोन येऊ लागले.
पोलिसांनी दिली सुरक्षा
पोलीस अधीक्षक दीपक भार्गव यांनी त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षकांनी भुरसिंग यांच्या संरक्षणासाठी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. पोलिस अधीक्षक दीपक भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या क्रमांकावरून धमकीचे फोन येत आहेत, त्यांची माहिती काढून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.