मुंबई – समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. मुलायमसिंग गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात होते, प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त केली. परंतु राज्यातील एका भाजप नेत्याने त्यांच्याविषयी केलेल ट्विट सध्या चर्चेत आलं आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या सोशल मीडियावरून मुलायम सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासाठी त्यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात, “कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो.”
काय होत नेमके प्रकरण
मुलायम सिंह हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असताना विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांकडून बाबरी मशिदीचा मुद्दा पुढे आणायला सुरुवात झाली होती. अशात युपीमध्ये कारसेवाही सुरु करण्यात आली होती. यावेळी कारसेवकांनी बाबरीच्या दिशेने प्रवास सुरु केला होता आणि मोठा जमाव निर्माण झाला होता त्यावेळी मुलायम यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते ज्यात अनेक कारसेवक मृत्युमुखी पडले होते.परिणामतः राज्यात मुलायम यांचे सरकार जाऊन भाजपचे सरकार आले होते.