भाजपच्या वतीने ‘का’ बाबत “घर-घर संपर्क” अभियानास प्रारंभ

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण देशभरात आज पासून  घर घर संपर्क अभियानाची सुरवात झाली आहे. ‘का’ कायद्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून आज बिंदू चौक येथे भाजपच्या वतीने खासदार अमर साबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली “घर-घर संपर्क” जनजागृती अभियानास सुरवात करण्यात आली.
शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी याध्ये आपला सहभाग नोंदवला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भारत माता की जय,  CAA के सन्मान मे कोल्हापूरकर मैदान मे,  तुम जातीवाद से तोडोगे हम राष्ट्रवाद से जोडेंगे,  INDIA SUPPORT CAA अशा घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून सोडला.
राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी बिंदू चौक येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले, हा कायदा अस्तित्वात येण्यासाठी जी मतदान प्रक्रिया झाली या मतदान प्रक्रियेमध्ये साक्षीदार असणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे सांगितले.
आज देशभरात एका विशिष्ट समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण करून देशांमध्ये असंतोष निर्माण करण्याचे काम सुरू आहे परंतु हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे कोणाचेही नागरिकत्व काढून घेणारा हा कायदा नाही.
त्यामुळे भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोचून, समाज मेळावे घेऊन जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत या कायद्याबाबत जनजागृती आणि असणारा गैरसमज दूर करण्याचे काम केले पाहिजे.
यानंतर पदाधिकारी यांचे सोबत बिंदू चौक ते अकबर मोहल्ला भागात जाऊन अकबर मोहल्ला घिसाड गल्ली येथे अल्पसंख्यांक समाजाच्या बऱ्याच घरांमध्ये त्यांनी स्वतः भेट देऊन या कायद्याबाबत मार्गदर्शन दिले, लोकांशी संवाद साधला या त्यांच्या अभियानास लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी प्रास्ताविक करून, कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली तसेच बूथ स्तरावर जाऊन कार्यकर्त्यांनी हे अभियान सक्षमपणे राबवण्याचे व जास्तीत जास्त लोकांना 88662 88662 या टोल फ्री नंबर मिस कॉल करून या कायद्यास समर्थन दर्शवण्याचे आवाहन केले.
हिंदू एकता चे दीपक मगदूम म्हणाले, भारत देशामध्ये कलम ३७०, तिहेरी तलाक, राम मंदिर निर्माण तसेच नागरिकता संशोधन विधेयक असे अनेक देशहिताचे निर्णय हे फक्त भारतीय जनता पार्टीचे सरकारच घेत असल्याने कायम भारतीय जनता पार्टीच्या सोबत असल्याचे नमूद केले.
प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, हा कायदा मुस्लिम विरोधी असल्याचा समज काँग्रेस आणि विरोधक करत आहेत. परंतु ३०८ खासदारांच्या विश्वासावर सपष्ट बहुमताने हा कायदा पारित करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी देशात असंतोष प्रसरवण्याचे प्रकार बंद करावेत.
यावेळी सरचिटणीस विजय जाधव, सुभाष रामुगडे, नगरसेक विजय खाडे, गीता गुरव, गणेश देसाई, हेमंत आराध्ये किरण कुलकर्णी आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.