भाजप, संघाविरोधातील लढ्याचा जोश दहापटीने वाढेल-राहुल

मुंबई – कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधातील विचारसरणीचा लढा सुरूच राहील. उलट, त्या लढ्याचा जोश दहापटीने वाढेल, असा निर्धार राहुल गांधी यांनी गुरूवारी बोलून दाखवला.

एका खटल्यासाठी येथे आलेले राहुल न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. मी गरीब, शेतकरी आणि कामगारांबरोबर आहे. मागील पाच वर्षांत मी जो लढा दिला; त्याची तीव्रता दसपटीने वाढेल. आक्रमण होत आहे आणि मला मजाही येत आहे, असेही ते म्हणाले. मात्र, त्याबाबत अधिक बोलण्याचे टाळत त्यांनी मला जे काही म्हणायचे होते ते राजीनामापत्रात नमूूद केल्याचे म्हटले. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत बुधवारी चारपानी राजीनामापत्र जारी केले. त्यात त्यांनी व्यापक भूमिका मांडली.

दरम्यान, राहुल यांच्या निर्णयामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते व्यथित झाल्याची प्रचिती न्यायालयाबाहेर आली. न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते. राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती करणाऱ्या घोषणा त्यांनी दिल्या. तशा आशयाचे फलकही त्यांच्या हातात झळकत होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.