जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद देत भाजपाचा सरकार स्थापनेचा दावा
नवी दिल्ली : हरियाणात जननायक जनता पक्षाने (जेजेपी) भाजपाशी युती करून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल जेजेपीला उपमुख्यंत्रीपद दिले जाणार आहे.
दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
हरियाणातील सत्तास्थापनेबाबतच्या हलचालींना शुक्रवारी वेग आला. जेजेपीचे प्रमुख दुष्यंत चौताला यांनी राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 90 सदस्यांच्या विधानसभेत 10 जागा असणाऱ्या जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी शहा यांनी दाखवली.
अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री भाजपाचा तर उपमुख्यमंत्री जेजेपीचा असेल. भारतीय जनता पक्षाच्या उद्या होणाऱ्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे हे निश्चित करण्यात येईल.
हरियाणात बलशाली असणाऱ्या जाट समाजाने गेल्या कही निवडणुकांत भाजपाविरोधी मतदान केले आहे. या समाजाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न भाजपाकडून या निमित्ताने चौताला यांच्या माध्यमातून केला जाण्याची शक्यता आहे.
सध्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचीच भाजपाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवडीच्या औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करतील. चौताला हेच उपमुख्यमंत्रीपदी निवडले जाण्याची शक्यता आहे.