जळगाव – भाजप खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. यासह विधानपरिषदेमधील आमदार स्मिता वाघ यांचा देखील उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर मुक्ताईनगर विकास सहकारी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येतील हे निश्चित झाले आहे. रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
त्याबरोबर स्मिता वाघ यांचा अर्ज बाद झाल्याने अमळनेर विकास सोसायटीमधून काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे हे जिल्हा बँक निवडणुकीत विरोधात उभे होते. त्यामुळे या निवडणूकीला जास्तच महत्व प्राप्त झाले होेते. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागून होताे. मात्र ऐनवेळेत रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने एकनाथ खडसे यांच्या विजय निश्चित मानल्या जात आहे.