मुंबई – भाजप या देशात संविधानिक पदावर आणि संस्थेच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम करत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप आमदारांनी त्यांच्या निलंबनाला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानंतर नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
घटनेनुसार निर्माण झालेली संस्था किंवा पदाचा आदर करावा व त्या अधिकारावर गदा आणण्याचे काम करु नये, असा सल्लाही नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे. नि
लंबनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलेल्या भाजप आमदारांना सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे न्याय मागण्याचे आदेश देत स्थगिती देण्यास नकार दिला आहे. शेवटी सुप्रीम कोर्टाने संविधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवून निर्णय दिला आहे अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.
विधानसभेत कुठलाही आमदार गैरवर्तन करत असेल तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो. असे असताना त्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने संविधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवत भाजप आमदारांच्या अर्जावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता तरी भाजपला संविधानिक संस्थेचे महत्त्व कळले पाहिजे असे नवाब मलिक म्हणाले.