जळगाव : राज्यात सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहताना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी कल्याणमधील भाजपा नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी, आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे अनावधानाने ते बोलून गेले. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.मात्र आता, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्याबाबतीतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. जिल्हा बँक निवडणुकांतील सत्तास्थापनेच्या बैठकीत बोलताना एकनाथ खडसेंनी आपल्या भाजपकडेच अध्यक्षपद राहिल, असे म्हटले. त्यांच्या विधानाने काही वेळासाठी एकच गोंधळ उडाला होता.
एकनाथ खडसेंनी भाजपात तब्बल ४० वर्ष काम केले. या कार्यकाळात त्यांना भाजपाकडून मोठ-मोठ्या पदांवर काम करण्याची संधी देखील मिळाली. मात्र, घोटाळ्याचे आरोप आणि पक्षांतर्ग वादातून त्यांनी भाजपला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सहकार पॅनलची अजिंठा विश्राम गृहात बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेही हजर होते. या बैठकीनंतर पत्रकारांनी अध्यक्षपदासंदर्भात एकनाथ खडसेंना प्रश्न विचारला होता. त्यावर, या निवडणुकीवर बहिष्कार घातलेल्या भाजपाला तीन वर्ष अध्यक्षपद दिले जाईल, असे खडसेंनी म्हटले. त्यानंतर, जवळच असलेल्या गुलाबराव पाटील यांनी खडसेंना चूक लक्षात आणून दिली. त्यावेळी, एकनाथ खडसेंनी आपण 40 वर्षे भाजपात होतो, त्यामुळे ही चूक होणं साहजिक असल्याचे म्हणताच पत्रकारांसह सगळेच हसायला लागले.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाला तीन वर्षे, शिवसेनेला दोन वर्षे असे अध्यक्षपद दिले जाणार आहे. काँग्रेस पक्षाला दोन वर्षे उपाध्यक्षपद तर सेनेला दोन वर्ष आणि राष्ट्रावादीला एक वर्षे उपाध्यक्षपद दिले जाणार असल्याचे शेवटी खडसेंनी स्पष्ट केले.