भाजपला गळती अन्‌ राष्ट्रवादीची चलती

कर्जत – गेल्या तीन- चार वर्षांपासून कर्जत तालुक्‍यातील राजकारणात अनेक स्थित्यंतरे होत आहेत. सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षातील नेते अधिकाधिक सक्रिय होत आहेत. भाजपला गळती आणि राष्ट्रवादीची चलती, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. भाजपचे नेते नामदेव राऊत यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने कर्जत भाजपत मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.

कर्जत भाजपमधील ओबीसीचा चेहरा म्हणून राऊत यांच्याकडे पाहिले जात होते. कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज आहे. राऊत यांच्या कृतिशीलतेमुळे समाजातील लोकांचा त्यांना मोठा जनाधार मिळत गेला. अनेक वर्षे भाजपत राहिल्याने पक्षात त्यांचे चांगले चालत होते. प्रा.राम शिंदे, खा. सुजय विखे पाटील व पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांना वेळोवेळी ताकद दिली. नगरपंचायतीच्या माध्यमातून ते शहरातील घराघरात पोहोचले. मात्र अचानक झालेल्या त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने भाजप ओबीसीचा चेहरा गमावून बसले आहेत. विखे हे भाजपत आहेत. मात्र ते राजकीय पक्ष नावापुरताच वापरतात हे सर्वश्रुत आहे.

विखे कुटुंबीयांची विचारधारा जनतेसमोर मांडून ते राजकीय अस्तित्व जपतात. त्यांची निष्ठा जपणारे मोजकेच लोक कर्जतच्या राजकारणात सक्रिय आहेत. यामध्ये जिल्हा बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी उपसभापती दादासाहेब सोनमाळी यांची नावे अग्रस्थानी आहेत. विखेंचा आशीर्वाद असेल तर राजकीय कारकीर्द फुलत राहते, पदे मिळत राहतात, याचा अनुभव अनेकांच्या जमेला आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये राजकीय उलथापालथ होत आहे. आ. रोहित पवारांनी भाजपला चांगलेच घेरले आहे. विकासाचे व्हिजन घेऊन चालणाऱ्या प्रा. राम शिंदे यांना घातकी नेत्यांमुळे वेळोवेळी मर्यादा आल्या. सत्तेच्या काळात पोसलेले त्यांच्यापासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांची कर्जतच्या राजकारणावरील पकड ढिली होताना दिसत आहे. आज सोबत असणारे उद्या असतीलच याचा भरोसा राहिलेला नाही. प्रा. राम शिंदे यांचे समर्थक एकापाठोपाठ एक पक्ष सोडून जात असल्याने नगरपंचायतीसाठी उमेदवार शोधण्यासाठी त्यांची कसरत होणार आहे. या परिस्थितीत ‘विखे पॅटर्न’ अधिक सक्रिय होईल.

विखेंचे कर्जतमधील राईट हॅन्ड म्हणून ओळखले जात असलेले अंबादास पिसाळ हे नगरपंचायत निवडणूकीत अधिक सक्रिय होतील. भाजपतील नेतृत्वाची पोकळी विखे हे पिसाळ व सोनमाळी यांच्या माध्यमातून भरून काढतील. राऊत यांच्या जागी दादासाहेब सोनमाळी हे ओबीसीचा चेहरा म्हणून प्रमोट होतील. जनतेला पक्षनिष्ठ व विचारनिष्ठ लोक हवे असतात. सोनमाळी या कसोटीत बसतात. त्यामुळे पिसाळ, सोनमाळी यांच्या राजकारणाला आणखी ‘अच्छे दिन’ येतील असे चित्र आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.