राज्यातील आजच्या परिस्थितीला भाजपच जबाबदार

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आता कुठे सुटत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने हातमिळवणी केली आहे. दरम्यान, शिवसेना आमदारांची मातोश्रीवरील बैठक संपली असून या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी राज्यात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे त्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी केला.

राज्यात जेव्हापासून पेच निर्माण झाला आहे तेव्हापासून देवेंद्र फडणवीस वगळता नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचा फोनही आला नसल्याची माहिती उद्दव ठाकरे यांनी आमदारांना दिली. या बैठकीत आमदारांनी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी केली. दरम्यान शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत एकत्र राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. सर्व आमदार मुंबईतच एकत्र राहणार असल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली आहे. याआधी आमदारांनी जयपूरला हलवलं जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र सुनील प्रभू यांनी हे चुकीचे वृत्त असल्याचे सांगत सर्व आमदार मुंबईतच थांबणार असल्याची माहिती दिली.

शिवसेना आमदार उदय सामंत यांनी बैठकीनंतर बोलताना, शिवसेनेच्या आमदाराला कोणी फोडू शकत नाही असा विश्वास व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरेंना सर्व अधिकार देण्यात आले असून ते सांगतील तो निर्णय अंतिम आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत येत्या दोन ते तीन दिवसांत सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्‍यता आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची मागणी होती ती आम्ही समोर ठेवली आहे. सर्व आमदारांना एकत्रित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. महाराष्ट्राचं नेतृत्त्व उद्धव ठाकरेंनी करावे हीच आमदारांची इच्छा आहे. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील,असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे हे एकमेव नाव चर्चेत असून इतर कोणाच्याही नावाची चर्चा नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)