भाजपाच खरी तुकडे-तुकडे गॅंग – सुखबीरसिंग बादल

पंजाबमध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप

चंडीगढ – भारतीय जनता पार्टीच खरी तुकडे-तुकडे गॅंग आहे. तो पक्ष हिंदू आणि शीखांना एकमेकांविरोधात उतरवरून पंजाबमध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी मंगळवारी केला.

शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एसएडीने अलिकडेच भाजपबरोबरची मैत्री तोडली. त्यांनतर त्या पक्षाकडून सातत्याने भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. आता बादल यांनी नव्याने पूर्वाश्रमीच्या मित्रपक्षावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकारच्या बाजूने बोलणाऱ्याचा उल्लेख देशभक्त म्हणून केला जातो. तर, विरोधात बोलणाऱ्याला तुकडे-तुकडे गॅंगचा सदस्य म्हटले जाते. खरेतर, भाजपनेच राष्ट्रीय ऐक्‍याचे तुकडे केले आहेत. त्या पक्षाने हिंदूंना मुस्लिमांविरोधात भडकावले.

आता शांतताप्रिय पंजाबी हिंदूंना त्यांच्या शीख बांधवांविरोधात आणि विशेषत: शेतकऱ्यांविरोधात चिथावण्याचे प्रयत्न होत आहेत, असे ट्विट बादल यांनी केले. केंद्रीय कृषी कायद्यांबाबतचा मग्रूर दृष्टीकोन सोडून भाजपने शेतकऱ्यांच्या मागण्या स्वीकाराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी सध्या दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावरून पंजाबमधील राजकारण तापले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.