Haryana Election – हरियाणात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. त्या पक्षाच्या नव्या सरकारचा शपथविधी १७ ऑक्टोबरला होईल. त्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
पंचकुलामधील दसरा मैदानावर गुरूवारी सकाळी १० वाजता हरियाणाचे मुख्यंमत्री, मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. त्या सोहळ्याला भाजपचे प्रमुख नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारून भाजपने हरियाणाची सत्ता राखली. मावळते मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांना चेहरा बनवून भाजपने ती निवडणूक लढवली. त्या पक्षाने विजयाची हॅट्ट्रिक केल्याने सैनी यांच्याकडेच नेतृत्व कायम राहणार असल्याचे मानले जात आहे.
हरियाणात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्यातील ४८ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. हरियाणातील भाजपची ती कामगिरी आजवरची सर्वोच्च ठरली आहे. त्या पक्षाचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेसचेही संख्याबळ (३७ जागा) यावेळी वाढले. मात्र, त्या पक्षाचे हरियाणाची सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न भंगले.