पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त
बीड: मुंडेंच्या रक्तात बेईमानी नाही. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी अनेकांना मोठं केलं पण कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. तसेच मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, पण मला कोणतंही पद मिळू नये म्हणून कुणी प्रयत्न करतेय का? पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो, मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असं आवाहनच पंकजा मुंडेंनी भाजपा नेतृत्वाकडे केलं आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.
या वेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रीतम मुंडे, जेष्ठ नेते एकनाथ खडसे, रासपचे महादेव जानकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या, जर पदाच्या हव्यासापायी माझ्यावर आरोप होत असतील, तर मी कोअर कमिटीतून मुक्ती मागते, अशी आक्रमक भूमिका घेत मुंडेंनी नाव न घेता भाजपा नेतृत्वावर निशाणा साधला आहे. तसेच ‘मी कुणाकडेही काही मागणी करणार नाही, माझी कोणाकडून काही अपेक्षा नाही. काही जण म्हणतात, पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत, प्रदेशाध्यक्षपद, विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी दबाव आणू पाहत आहेत, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलेलं आहे.
‘1 डिसेंबरपूर्वी दररोज टीव्हीवर संजय राऊत दिसायचे. परंतु त्यानंतर सर्वत्र फक्त पंकजा मुंडे दिसू लागली, केवळ माझ्याबाबतची चर्चा सुरू आहे, नाथाभाऊ म्हणाले तसं आम्हाला ढकलत ढकलत दारापर्यंत आणलं, मी पक्ष सोडण्याच्या वावड्या का उठल्या? मी उत्तर देणार नाही, पक्ष उत्तर देईल, पराभवाने खचणारी मी नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनीही स्वपक्षीयांनाच घरचा आहेर दिला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर झाले होते, त्यानंतरही एक-एक आमदार जोडण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करते आणि तुम्ही म्हणता मी बंड करणार, कोणाविरोधात? माझ्या कुठल्याही अपेक्षा नाहीत. मला वाघीण म्हटलं की विरोधकांच्या पोटात दुखतं, आता तरी मी आमदारही उरले नसल्याचंही खंतही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली आहे.