पाटणा : कोलकत्यातील बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा पलटवार तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. कोलकत्यामधील घटना अतिशय निषेधार्ह स्वरूपाची आहे.
त्यामुळेच बंगालमधील तृणमूल सरकारने कठोर स्वरूपाचे अपराजिता विधेयक आणले. त्याचे रूपांतर जरब बसवणाऱ्या बलात्कारविरोधी कायद्यात होईल. त्याला राज्यपालांची लवकर मंजुरी मिळेल अशी आम्हाला आशा आहे. बंगालसारखे पाऊल उचलण्यास इतर राज्येही प्रेरित होतील. मात्र, कोलकत्यातील घटनेवरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे योग्य नाही.
भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तरप्रदेश, मणिपूरमध्ये आणि इतरत्र लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या. त्यावरून कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, असे सिन्हा पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सिन्हा प्रदीर्घ काळ भाजपमध्ये होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी तेा पक्ष सोडला. तृणमूलमध्ये दाखल झाल्यापासून ते पूर्वाश्रमीच्या पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडण्याची संधी साधताना दिसतात.