पदवीधर व शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप कटिबद्ध

सुभाषराव देशमुख; भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

खंडाळा  -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासामुळे देशातील विविध निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळाले आहे. हा पक्ष समाजातील सर्व घटकांना विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा आहे. पदवीधर व शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते सुभाषराव देशमुख यांनी केले. 

पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ खंडाळा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी आमदार व किसन वीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन भोसले, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, युवा नेते केतन भोसले, खंडाळ्याचे नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय गाढवे, नगरसेवक युवराज गाढवे, साजिद मुल्ला, विकास गाढवे, डी. जी. गाढवे, राजकिरण खंडागळे, श्रीराम गाढवे उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, उमेदवाराची क्षमता, अभ्यास व कार्यपद्धती पाहून संग्रामसिंह देशमुख व जितेंद्र पवार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पक्षाची ध्येयधोरणे व विकासाची दृष्टी असणाऱ्या या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे. मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुक्‍यात नियोजनबद्ध प्रचार सुरू आहे.

पक्ष संघटना व विकासाची दृष्टी नसलेल्या उमेदवारांना दूर ठेवा. मदन भोसले म्हणाले, या निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. खंडाळा तालुक्‍यात भाजपच्या उमेदवारांसाठी कार्यकर्ते करत असलेले काम उल्लेखनीय आहे. या निवडणुकीत हे काम यश मिळवून देईल. मतदारांनी मतदान प्रक्रिया समजून घेऊन भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावे. अनिरुद्ध गाढवे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य लक्ष्मण सोळसकर यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य मोहन भोसले यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.