भिगवणमध्ये उद्घाटन : भाजप-राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा
भिगवण – येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमधील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन भाजपच्या वतीने इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके यांनी आले. शनिवारी (दि. 8) सायंकाळी बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन प्रस्तावित होते. त्यापूर्वीच भाजपने सर्जिकल स्ट्राईक करीत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉमा केअर सेंटर इमारत मंजूर झाल्याचा व पंचायत समितीने भिगवण येथे कोविड केअर सेंटरच्या मागणीस यश आल्याचा दावा करीत कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पंचायत समितीच्या माध्यमातून केले. त्यामुळे उद्घाटनावरून इंदापूर तालुक्यात भाजप- राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
समारंभासाठी उपसभापती संजय देहाडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक वणवे, कर्मयोगीचे संचालक यशवंत वाघ, इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे, माजी सरपंच पराग जाधव, तक्रारवाडीच्या सरपंच शोभाताई वाघ, डिकसळचे सरपंच सूर्यकांत सवाणे, मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते, ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर, रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर, सुनील काळे, सतीश काळे, राजेंद्र जमदाडे, विकास वाघ, दिनेश मारणे, माऊली मारकड, गणेश वायदंडे, हनुमंत काजळे, विश्वास देवकाते, युवराज काळंगे, तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेखा पोळ, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट उपस्थित होते.
रेडके म्हणाल्या, भिगवण परिसरामध्ये करोना रुग्णाची वाढती संख्या विचारात घेऊन भिगवण येथे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीच्या माध्यमातून केली होती. कोविड केअर सेंटरमुळे या भागातील रुग्णांची सोय होईल असे त्यांनी नमूद केले. यावेळी उपसभापती संजय देहाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले.
- भिगवण परिसरातील नागरिकांची सोय व्हावी, यासाठी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करण्यात आले.
– अशोक शिंदे, संचालक, इंदापूर अर्बन बॅंक