BJP in Vidhansabha Election । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली रणनीती आखली आहे. त्यासाठी पक्षाकडून एक सर्व्हे देखील करण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभेच्या २८८ पैकी कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार कायम आहे. कारण भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा विधानसभेला पक्षाने 150 जागा लढवणे कशाप्रकारे आवश्यक आहे, हा मुद्दा उचलून धरला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात अमित शाह यांचे विश्वासू असलेले भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती.
भूपेंद्र यादव यांच्याकडून भाजपच्या विभागनिहाय मॅरेथॉन बैठका घेतल्या जाणार आहेत. ते सोमवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात एक बैठक घेणार आहेत. या बैठकीला प्रभारी भूपेंद्र यादव,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री संजय केनेकर, विजय चौधरी,विक्रांत पाटील, माधवी नाईक, चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जाईल. त्याचप्रमाणे अमित शहा 16,17,18 तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यासंदर्भातील देखील नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. आज सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने कोणते निर्णय घेतले जातात, हे पाहावे लागेल.
भाजप 150 पेक्षा जास्त जागा लढवणार ?
राज्यात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभानिहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या ती जागा त्याच पक्षाकडे राहील. मात्र काही मोजक्या जागा आहेत त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.
जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे याबाबत लोकसभा निकाल व सर्वेक्षण अहवाल याचा आधार घेतला जाईल. आगामी विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचा अधिकार कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटप आणि विधानसभेची रणनीती यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा
‘केंद्रातील सरकारचं चोरांचे भागीदार…’; हिंडेनबर्गच्या अहवालानंतर ठाकरे गटाची टीका