प्रचारात भाजप दोन पाऊल पुढे

संग्रहित छायाचित्र....

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून श्रेयवादावर पडदा

रेल्वे मार्ग विस्तारीकरणास प्राधान्य

मेट्रोच्या कामाला गती देणे, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. पवना नदी प्रदूषण मुक्‍त करणे, रायगडमधील उल्हास नदी प्रदूषण मुक्‍त करणे, गड-किल्ले, लेण्यांचे संवर्धन करणे, मतदारसंघातील उद्योगधंद्यांना चालना देणे, उरण, पनवेल, कर्जत परिसरात लोकलचे फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यात येतील. याचबरोबर पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावणार आहे. पीएमआरडीएअंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मावळातील दुर्गम भागात रस्ते, वीज पोहचविली आहे. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्‍न सोडविणार असल्याचेही बारणे यांनी सांगितले.

पिंपरी – खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयानंतर शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये श्रेयवादावरुन जुंपली होती. मात्र, भाजपने दोन पाऊल पुढे जाऊन आपला प्रचार केल्याचे सांगत बारणे यांनी आज (बुधवारी) या श्रेयवादावर पडदा टाकला. हे यश कोणा एकाचे नसून तर युतीच्या कार्यकर्त्यांचे यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविल्यानंतर बारणे यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला शहर संघटिका उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका रेखा दर्शले, अनिता तुतारे, बशीर सुतार आदी उपस्थित होते.

मावळमधून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या विरोधात तब्बल दोन लाख मताधिक्‍क्‍याने शिवसेना खासदार बारणे यांनी विजय मिळविला. त्यांच्या या विजयानंतर शिवसेनेचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी आपल्यामुळे पिंपरीतून बारणे यांना 41 हजाराचे मताधिक्‍य मिळाल्याचा दावा केला होता. त्यावरुन भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये संताप पसरला होता. एका नगरसेवकाने आम्ही काय गोट्या खेळत होतो का, असा सवाल केला होता. त्यावरून शिवसेना व भाजपमध्ये वाक्‌युद्ध सुरू झाले असताना खासदार बारणे यांनी भाजपने दोन पाऊल पुढे जावून प्रचार केल्याचे सांगत या वादावर पडदा टाकला.

विधानसभा निवडणुकीत युती, जागा वाटप तसेच मंत्रीमंडळात स्थान याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगत बारणे यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले. मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍नांना चालना देणे हाच आपला पाच वर्षाचा मुख्य अजेंडा असणार आहे. त्यादृष्टीने पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, एचए कंपनी पुनःजीवित करणे, रेड झोन, उद्योगधंद्यांना चालना देणे, गोरगरीब नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)