BJP in Delhi Election Results । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजप स्पष्टपणे बाजी मारताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार, दिल्लीतील 70 जागांपैकी तब्बल 40 जागांवर भाजप, आम आदमी पक्ष 30 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस पक्षाला खातेदेखील उघडता आलेले नाही. मतमोजणीचे हे कल कायम राहिल्यास भाजप तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत पुन्हा सत्ता हस्तगत करेल. हे सर्व असेच घडले तर भाजपसाठी मोठे यश ठरणार आहे.
दिल्लीतील गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ने एकहाती बाजी मारली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘आप’च्या दिल्लीतील मक्तेदारीला शह दिल्याचे दिसत आहे साधारण दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत भाजपच्या जागा वाढणार असल्या तरी विजय मात्र आम आदमी पक्षाचाच होईल आणि सत्ता देखील त्यांचीच येईल, असे चित्र दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होते. मात्र, गेल्या महिनाभरात भाजपने विधानसभा निवडणुकीत कमबॅक केल्याचे दिसून आले.
मायक्रो प्लॅनिंगही तितकेच परिमाणकारक
भाजपने दिल्लीत गेल्या महिनाभरात प्रचंड आक्रमक प्रचार केला. आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेल्या अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांना भाजपने थेट लक्ष्य केले. या दोन्ही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यामुळे दोन्ही नेत्यांवर तुरुंगावारीची वेळ आली. या सगळ्यामुळे इतके दिवस स्वच्छ प्रतिमा असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या कारकीर्दीला कलंक लागला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बुथ स्तरावर जाऊन केलेले मायक्रो प्लॅनिंगही तितकेच परिमाणकारक ठरले.
भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात सूक्ष्म नियोजन करण्यात आले. उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यंत प्रत्येक टप्प्यावर भाजपने अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केला होता. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेही भाजपच्या मदतीला प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीत घरोघरी जाऊन प्रचार केला आणि आपला संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला. याचा भाजपला मोठा फायदा झाला. संघाच्या मदतीमुळे भाजपचा पारंपरिक मतदार मतदानाच्या दिवशी बाहेर पडला. याशिवाय, दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची न होऊ शकलेली युतीही भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे.
शिशमहाल, यमुनेतील प्रदुषणाचे नरेटिव्ह यशस्वी BJP in Delhi Election Results ।
भाजपने यंदाच्या निवडणुकीत यमुना नदीचे प्रदूषण आणि कचऱ्याची समस्या प्रभावीपणे मांडली. अरविंद केजरीवाल दिल्लीकरांना पाण्यातून विष पाजत आहेत, अशी टीका भाजपने केली होती. यावरुन भाजपने आक्रमक प्रचार केला होता. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानासाठी कोट्यवधी रुपये कसे खर्च केले, याचा तपशील भाजपने मांडला होता. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना यावर उत्तरं द्यावी लागली होती. तसेच पंतप्रधान मोदी यांनी केजरीवालांच्या शिशमहालाचे नरेटिव्ह आक्रमकपणे मांडले होते. स्वत: मोदींनी टीका केल्यामुळे भाजप नेतेही आक्रमक झाले होते. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत शिशमहाल हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता.
केजरीवालांच्या घोषणांचा फॉर्म्युला भाजपने केला फेल? BJP in Delhi Election Results ।
आतापर्यंत दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ने भाजपला धूळ चारुन तीनवेळा दिल्लीची सत्ता हस्तगत केली होती. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेल्या लोकप्रिय घोषणांचा प्रमुख वाटा राहिला होता. केजरीवाल यांनी गरिबांना मोफत वीज, पाणी, आर्थिक अनुदान आणि आरोग्य सुविधा देऊ केल्या होत्या. या योजनांमुळे ‘आप’ला प्रत्येक निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. पंतप्रधान मोदी आणि भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या या राजकारणाला ‘रेवडी पॉलिटिक्स’ म्हणून हिणवले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपकडूनही सामान्य मतदारांना अनेक भुलवणारी आश्वासने देण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वीच एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला होता. यामध्ये 12 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले होते. हा सामान्य नोकरदारांसाठी मोठा दिलासा मानला जातो. त्यामुळे दिल्लीतील सामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गाने भाजपच्या पारड्यात भरभरुन मते टाकल्याचे दिसत आहे.