राजधानी दिल्लीत भाजपाला दणका; उमेदवारी न मिळाल्याने खासदार उदित राज यांचा कॉंग्रेस प्रवेश

नवी दिल्ली – उत्तर-पश्‍चिम दिल्लीतील मतदारसंघातून गायक हंसराज यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे विद्यमान खासदार उदित राज नाराज झाले असून त्यांनी बुधवारी थेट कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दलितांसाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का, असा प्रश्नही उदित राज यांनी विचारला आहे. उदित राज हे दलित समाजातील नेते असून कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनी त्यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत केले आहे.

उदित राज यांनी मंगळवारी भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत दिले होते. उदित राज हे दिल्लीतील उत्तर पश्‍चिम लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने उदित राज यांना डावलून गायक हंसराज यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने मला तिकीट नाकारुन अन्याय केला आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार नाही. पण भाजपने मला पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले असून मी अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी मंगळवारी म्हटले होते. अखेर बुधवारी सकाळी उदित राज यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उदित राज म्हणाले, भाजपनेच मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. 2018मध्ये ऍट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात दलित समाजाने बंदची हाक दिली होती. मी देखील या बदलांनाविरोध केला होता. यामुळेच पक्षातील वरिष्ठ नेते माझ्यावर नाराज झाले असावेत. मी मुद्दे उपस्थित करायला नको का?, मी यापुढेही दलित समाजाच्या हितासाठी आवाज उठवतच राहणार, असे त्यांनी सांगितले. फक्त दलित असल्याने तुम्ही दलित नेते ठरत नाही. तुम्हाला दलित समाजाच्या हितासाठी लढावे लागते, असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.