मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर माजी खासदार किरीट सोमय्या वगळता इतर भाजप नेत्यांनी मौन बाळगले होते. भाजपकडून या प्रकरणावर मौन का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र २४ तासानंतर भाजपकडून खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहे. पाटील यांनी मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून म्हटलं की, सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. मात्र गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे हे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करतील असं वाटत नसल्याचे पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध केले होते, त्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती असंही म्हटले आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या @dhananjay_munde यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ! @OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/PVrlONAoBb
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 13, 2021
बलात्काराचे आरोप झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असून माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहे.
मुंडे पुढे म्हणाले की, करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिल्याचेही मुंडे यांनी नमूद केले होते.