“सावरकरांना ‘कलंक’ आणि ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारी आयात मंडळी भाजपमध्ये”

शिवसेनेची सामनामधून भाजपवर कडाडून टीका

मुंबई : देशात सध्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून हिंसक वातावरण निर्माण झाले आहे. त्याच नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपा सरकारवर कडाडून टीका केली आहे. गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. भारतरत्न देऊन सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कोणी रोखले होते? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

एवढेच नाही तर सावरकरांना कलंक आणि माफीवीर म्हणून हिणवणारी आयात मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर बसली आहेत. त्यांचे तुम्ही काय करणार आहात? महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे. सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून देश का पेटला, याचे उत्तर आधी जनतेला द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्यापेक्षा महत्त्वाचे आणि लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न राज्यातील जनतेसमोर आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. नागरिकता सुधारणा कायद्यावरून देशात भडका उडाला आहे व प्रकरण केंद्र सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. कायद्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या. गोळ्या चालवल्या. आपल्याच देशातील विद्यार्थ्यांवर बंदुका रोखण्याची वेळ येते तेव्हा प्रकरण हाताबाहेर गेले असे समजावे. दिल्लीतील पोलिसांची कारवाई अमानुष आणि बेकायदेशीर आहे. जालियनवाला बाग हत्याकांडात इंग्रज यापेक्षा वेगळे वागले नव्हते, अशी टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.