सातारा -हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माफी मागावी, असे ट्विट भाजपच्यावतीने करण्यात आल्याने महाराष्ट्रात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. या प्रकरणात शरद पवार यांच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार भाजपला नाही, अशी टीका माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केली. “पाथरवट’ या जवाहर राठोड यांच्या कवितेचे निरूपण पवार यांनी केले होते. त्यामध्ये कोणाला दुखावण्याचा प्रश्नच येत नाही. या कवितेचा राजकीय अर्थ लावला जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माने म्हणाले, भटके-विमुक्त जातीजमाती संस्थेच्यावतीने पत्रकार निखिल वागळे यांना फुले-आंबेडकर पुरस्कार दि. 9 मे रोजी देण्यात आला होता. त्या कार्यक्रमात शरद पवार यांनी जवाहर राठोड या कवीची “पाथरवट’ ही कविता वाचून दाखवत, त्यावर निरूपण केले होते.
या कवितेच्या माध्यमातून पवारांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. अर्थात, त्यांना पवारांवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. या कवितेचा राजकीय अर्थ लावला जाऊ नये. “तोडा आणि फोडा’ हे तंत्र अवलंबून महाराष्ट्रामध्ये भाजप येत्या निवडणुकांमध्ये सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा गनिमी कावा बहुजन समाजाने तातडीने ओळखावा. हिंदू हा शब्द कोणत्याही उपनिषदामध्ये नाही. त्याचा पहिल्यांदा उल्लेख 1861 च्या ब्रिटिशांनी तयार केलेल्या गॅझेटमध्ये झाला होता.
ब्राह्मण हेसुद्धा भारतीय नाहीत. ते वैदिक आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ते हिंदू ब्राह्मण असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे. हे प्रमाणपत्र ते दाखवू शकणार नाहीत. बहुजन समाजाला सातत्याने उपेक्षेच्या अंधारात ठेवून, स्वतःलाच पुढे आणण्याचा कावा गेल्या 800 वर्षांपासून ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय या तीन जातींनी केला आहे. खैबरखिंडीतून आलेल्या या परकीय लोकांनी बहुजन समाजाला महाराष्ट्रातील लोकजीवनाची, सांस्कृतिक जडणघडणीची अक्कल शिकवू नये, असे जळजळीत वक्तव्य लक्ष्मण माने यांनी केले. पवारांनी वाचलेल्या कवितेचे राजकीय अन्वयार्थ लावणारे संकुचित मनोवृत्तीचे आहेत. या मनोवृत्तीला आत्ताच विरोध झाला पाहिजे. तसे झाले नाही तर ब्राह्मणांच्या कटकारस्थानांना बहुजन समाजाचे तरुण बळी पडतील. हिंदू हा शब्द गुलामीचे प्रतीक आहे. तो शब्द आपण झुगारला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.