नवी दिल्ली : महिलांबातचे गुन्हे दाखल असणारे सर्वाधिक लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यापाठोपाठ कॉंग्रेस आणि वायएसआरसीपी यांचा क्रम लागत आहे. भाजपाच्या 21 लोकप्रतिनिधींवर महिलांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. कॉंग्रेसच्या 16 तर वायएसआरसीपीच्या सात सदस्यांचा यात समावेश आहे. लोकसभेत 2009मध्ये असे गुन्हे दाखल असणाऱ्यांची संख्या दोन होती. ती 2019मध्ये 19वर पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे.
बलात्काराशी संबंधित खटल्यात तीन खासदार आणि सहा आमदार आरोपी आहेत. गेल्या पाच वर्षात अशा गुन्ह्यातील 41 जणांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 66 जणांना उमेदवारी दिली. कॉंग्रेसने 46 तर बहुजन समाज पक्षाने 40 जणांना उमेदवारी दिली आहे, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रटीक रिफॉर्मच्या अहवालात देण्यात आली आहे.
सध्याच्या 759 खासदार आणि चार हजार 63 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या अभ्यासातून ही माहिती उजेडात आली आहे. लोकसभेसाठी महिलांविरोधातील गुन्हे दाखल असलेल्या 126 जणांना उमेदवारी देण्यात आली. ही वाढ 2014 च्या तुलनेत 231 टक्के आहे. पश्चिम बंगालमधील सर्वाधिक लोकप्रतिनिधींवर (16) महिलांबाबतचे गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ ओडिशा आणि महाराष्ट्राचा क्रमांक (प्रत्येकी 12) लागतो.
असे गुन्हे दाखल असणारे 572 जण लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे उमेदवार होते. मात्र यातील एकालाही शिक्षा झालेली नाही. त्यापैकी 410 जणांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली होती. यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा सर्वाधिक (84) आहेत. त्यापाठोपाठ बिहारचा क्रमांक लागतो.