भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी; संधी कोणाला, उत्सुकता शिगेला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षांसाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने बुधवारी मुंबईत राज्यातील महापालिकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर केली. महापौरपद पुन्हा भोसरीकडे जाणार की चिंचवडला मिळणार याविषयी चर्चा रंगली असली तरी गेली अडीच वर्षे भोसरीतील नगरसेवकांना संधी मिळाली असल्यामुळे पुढील अडीच वर्षे हे पद चिंचवड विधानसभेतील नगरसेविकेला मिळण्याची शक्‍यता आहे.

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आज आरक्षण सोडत काढली. फेब्रुवारी-2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत महापालिकेत भाजप सत्तारुढ झाल्यानंतर महापौर पदासाठी पहिली संधी नितीन काळजे यांना मिळाली. 14 मार्च 2017 ते 24 जुलै 2018 असा त्यांचा कार्यकाळ राहिला. महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर 4 ऑगस्ट 2018 पासून राहुल जाधव हे महापौर आहेत. त्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी संपला आहे. मात्र, त्यांना 21 तारखेपर्यंत सध्या मुदतवाढ मिळाली आहे. काळजे आणि जाधव हे दोघेही भोसरी मतदारसंघातील आहेत. भाजपमध्ये सध्या भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे तर चिंचवड मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप असे नेतृत्व आहे. तुलनेत पिंपरी मतदारसंघात नेतृत्वाचा अभाव आहे.

भोसरीला गेले अडीच वर्षे महापौरपद मिळाले असल्याने आता चिंचवड मतदारसंघाच्या पारड्यात महापौर पद पडण्याची शक्‍यता आहे. तसेच, पुढील अडीच वर्षांच्या कालावधीतही प्रत्येकी सव्वा वर्ष याप्रमाणे दोन नगरसेविकांना संधी द्यायचे ठरल्यास भाजपच्या दोन नगरसेविकांना महापौरपदाची संधी मिळू शकते. भारतीय जनता पक्षाकडून 2017 मध्ये झालेले महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसाधारण गटातून 21 महिला नगरसेवक म्हणून विजयी झालेल्या आहेत. यातील तब्बल 9 नगरसेविका या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आहेत. यातील उषा उर्फ माई ढोरे या ज्येष्ठ असून त्यांच्या नावाची चर्चा सध्या रंगली आहे. याशिवाय करुणा चिंचवडे, संगीता भोंडवे, माया बारणे, आरती चोंधे, निर्मला कुटे यांच्यासह भोसरी विधानसभा मतदारसंघातील निर्मला गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

ज्येष्ठता आणि सभागृह चालविण्याचा अंदाज तसेच पक्षनिष्ठा या बाबी विचारात घेऊन पद दिले जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सर्वसाधारण गटातील महिलांची संख्या अधिक असल्यामुळे भाजपातील महापौरपदाची स्पर्धा तीव्र होण्याची शक्‍यता आहे. पक्षाकडून संधी कोणाला मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या पहिल्या महिला महापौर होणार
शहराच्या पहिल्या महिला महापौर म्हणून अनिता फरांदे यांना 13 मार्च 1997 ला संधी मिळाली होती. त्यानंतर मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, मोहिनी लांडे, शकुंतला धराडे या महिला नगरसेविकांना महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता 21 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत सातव्या महिला महापौर निवडल्या जाणार आहेत. भारतीय जनता पक्ष 2017 मध्ये महापालिकेत पहिल्यांदा सत्तेत आला आहे. त्यामुळे महापौर म्हणून निवडल्या जाणाऱ्या नगरसेविकेला भाजपच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळणार आहे.

महापौर पदासाठी 16 तारखेला दुपारी 3 ते 5 या वेळेत नगरसचिव कार्यालयामध्ये महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तर, 21 तारखेला त्यासाठी निवडणूक होईल. विभागीय आयुक्तांकडून त्यासाठी वेळ मिळेल. तसेच, पीठासीन अधिकारी नियुक्त होईल.
– उल्हास जगताप, नगरसचिव, पिंपरी महापालिका.


पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. महापौर पदासाठी खुल्या गटातील नगरसेविकांना संधी देताना ज्येष्ठता, कार्यक्षमता, सभागृह चालविण्याची क्षमता आदी बाबींचा विचार केला जाईल. प्रदेश पातळीवर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. खासदार, दोन्ही आमदार यांच्याशी विचारविनिमय करून सामूहिक निर्णय घेतला जाईल.
– एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते, महापालिका. 

Leave A Reply

Your email address will not be published.