भाजपा हॅटट्रिक करणार

अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसभेची एक जागा आहे. निवडणूक आयोगाच्या 2009 च्या अहवालानुसार अंदमान-निकोबारमध्ये एकूण मतदारांची संख्या 2,65,108 इतकी आहे. यामध्ये 1,23,959 महिला आणि 1,41,149 पुरुष मतदार आहेत.

2011 च्या जनगणनेनुसार अंदमान-निकोबारची एकूण लोकसंख्या 3,80,581 इतकी आहे. येथील 86.63 लोकसंख्या साक्षर आहे. या बेटांवरील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या गावांमध्ये आहे. आकडेवारीच पाहिल्यास सुमारे 2,44,411 लोक गावांमध्ये राहतात, तर 1,35,533 लोकसंख्या शहरांत आहे. लोकसंख्येच्या घनतेच्या दृष्टीने सर्वांत कमी घनता असणाऱ्या प्रदेशांमध्ये दुसऱ्या स्थानावर अंदमान-निकोबारचा क्रमांक लागतो. येथे प्रति किलोमीटर लोकसंख्या 46 इतकीच आहे. लोकसंख्येची सर्वांत कमी घनता अरुणाचल प्रदेशात आहे. तेथे हा आकडा 17 इतका आहे.

अंदमान-निकोबार हा बेटांचा समूह आहे. तेथे एकूण 572 बेटे आहेत. अंदमान आणि निकोबार हे दोन्ही स्वतंत्र बेटसमूह आहेत. अंदमानात 325 बेटे आहेत, तर निकोबारमध्ये 247. येथे प्रामुख्याने बंगाली भाषा बोलली जाते. तेथे 29 टक्‍के लोक बंगाली, 20 टक्‍के हिंदी, 15 टक्‍के तमिळ आणि 7 टक्‍के मल्याळम भाषा बोलतात.

या बेटसमूहांवर अधिकाधिक लोकसंख्या हिंदू आहे. हिंदूंची लोकसंख्या 70 टक्‍के आहे, तर ख्रिश्‍चनांची 21 टक्‍के आहे. मुसीलम लोकसंख्या 8.5 टक्‍के आहे.

राजकीय इतिहास
1967 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी तेथे निवडणुकीच्या माध्यमातून खासदार निवडला जात नव्हता, तर राष्ट्रपती त्याची नियुक्‍ती करत असत. 1967 मध्ये पहिल्यांदा तेथे निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांत कम्युनिस्ट पक्षाचे के. आर. एम. चक्रवर्ती यांचा विजय झाले. अंदमान निकोबारचे पहिले लोकनियुक्‍त खासदार म्हणून त्यांची इतिहासांत नोंद झाली. पण त्यानंतर 1971 ते 1999 अशी तब्बल 22 वर्षे इथे कॉंग्रेसच सातत्याने विजयी होत राहिली. मनोरंजन भक्‍त हे या काळात खासदार म्हणून इथून निवडून येत गेले. 1999 मध्ये विष्णु पाडा रे या भाजपाच्या उमेदवाराने त्यांचा विजयरथ अडवला. पण 2004 मध्ये पुन्हा मनोरंजन यांनी विजय मिळवला. 2009 मध्ये पुन्हा एकदा ही जागा भाजपाच्या विष्णु पाडा रे यांनी जिंकली. 2014 मध्ये ते पुन्हा विजयी झाले. त्या निवडणुकीत पाडा यांना 90,969 मते मिळाली होती. कॉंग्रेसचे कुलदीप राय शर्मा हे 83,157 मते मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले. थोडक्‍यात, 1977 पासून आतापर्यंत या प्रदेशात लोकसभेच्या 10 निवडणुका झाल्या आणि त्यापैकी 7 निवडणुकांत कॉंग्रेस विजयी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.