देशातील भूकबळीला भाजप सरकारच जबाबदार

मलकापूर येथील प्रचारसभेत माजी मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांचा आरोप

कराड  –
देशामध्ये महागाई वाढल्याने भूकबळीची संख्या मोठी असून निर्देशांकामध्ये भारताचा नंबर 102 आहे. पाकिस्तानचा नंबर 90 च्या आसपास आहे. जनता भूकेने लोक तडपड आहेत. बेरोजगारीवर सरकारला विचारले जात आहे. आता तुमच्या समजदारीची गरज आहे, तुम्ही महागाई, बेरोजगारी किंवा भूकबळीचा प्रश्न विचारा हे लोक 370 कलम सांगत आहेत.

पोटात भूक लागते तेव्हा भजन होत नाही. सर्वात पहिले पोट, भूक असते, यावर हे लोक बोलत नाहीत. केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप सिनेअभिनेते माजी मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.

मलकापूर, ता. कराड येथे आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण, आ. रामहरी रुपनवर, नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, बंडानाना जगताप, राजेंद्र यादव, आनंदराव सुतार, कराडचे विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील, नगरसेवक वैभव हिंगमिरे, मीना बोरगावे, कॉंग्रेस महिला आघाडी धनश्रीताई महाडिक, रजनीताई पवार, मनोज तपासे, अन्वरपाशा खान, शैलेश शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिन्हा म्हणाले, मी सत्य आणि सिध्दांत यांच्यासोबत असणारा माणूस आहे.

कराड ही यशवंतराव चव्हाण यांची भूमी आहे, तशीच ती पृथ्वीराज चव्हाण यांचीही आहे. लोकशाही वाचविण्यासाठी काही लोक लढत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पृथ्वीराज चव्हाण हे नांव सर्वात पुढे असल्याचे शत्रुघ्न सिंन्हा यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तीन महिन्यातच लोकांना लोकसभेच्या पोटनिवडणूकीला सामोरे जावे लागत आहे. लोकसभेची निवडणूक खऱ्याअर्थाने मतदारांवर लादण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करुन 22 कोटी रुपयांचा चुराडा केला आहे. त्यामुळे भाजप सरकार विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात तीव्र संताप आहे. त्यामुळे या निवडणूकीत मतदारराजा या सरकारला हद्दपार करेल. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्‍यात आली आहे.

अनेक अर्थतज्ञांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. लोकांच्या हाताला काम देण्याचे लांबच. मात्र त्यांच्या हातातील काम हिसकावून घेण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. फडणवीस सरकारने पश्‍चिम महाराष्ट्रात काहीही न करता विकासकामे ठप्प केली आहेत. भाजपने नुकत्याच काढलेल्या जाहिरनाम्यात एक कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्‍वासन देवून पुन्हा एखदा जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे.

आ. रामहरी रुपनवर म्हणाले, देशाच्या संसदीय कामकाजात महत्वपूर्ण कामगिरी बजावणारे अभ्यासू नेतृत्व म्हणून पृथ्वीराजबाबांची वेगळी ओळख आहे. आज देशाची अर्थव्यवस्थेची बिघडलेली घडी पूर्वपदावर आण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेतृत्वाला विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे.

बाबांच्या माध्यमातून कराड तालुक्‍यात भरीव स्वरुपाचा विकास केला आहे. मात्र विरोधकांची केवळ बेनटेक्‍सगिरी सुरू असल्याचेही आ. रुपनवर यांनी यावेळी सांगितले. यावेळी शैलेश शेवाळे, बंडानाना जगताप, साजिद मुल्ला, निलम येडगे, अजित पाटील, सौरभ पाटील यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजेंद्र यादव यांनी केले.

ईडी बी गेली, अन्‌ शानी बी गेली
40 वर्षे प्रेमीलाकाकीच्या छायाछत्राखाली मोठे झालेल्यांनी आज पडत्या काळात पक्षाशी गद्दारी केली आहे. त्या गद्दारांना जागृत मतदारांनी दारात उभे करु नये. असा इशारा देत ईडी बी गेली, अन शानी बी गेली, असा उपोरोधात्मक टोला आनंदराव पाटील यांचे नाव न घेता बंडानाना जगताप यांनी सभेत लगावला.

यूपी, बिहारच्या नेत्यांनी महाराष्ट्रांची मापे काढू नयेत
महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेली ही निवडणूक उमेदवारांची नसून मतदारांची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येवून यूपी, बिहारच्या नेत्यांनी महाराष्ट्रांची मापे काढू नयेत. आमचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांबाबत बेताल वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत. गडकिल्ल्यांना हात लावून देणार नाही, असा इशारा नगरसेवक सौरभ पाटील यांनी यावेळी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.