नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी शुक्रवारी येथे जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यामुळे मिशन जम्मू-काश्मीरसाठी भाजप सज्ज होत असल्याचे सूचित होत आहे. पुढील काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर, शहांनी घेतलेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील राजकीय स्थिती आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते.
विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकल्याच्या दिवशीच भाजपची बैठक झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, शहांनी बोलावलेली बैठक पूर्वनियोजित असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. आगामी निवडणुकीत बाजी मारून जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्या पक्षापुढे प्रामुख्याने नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, कॉंग्रेसचे आव्हान आहे.
जम्मू-काश्मीर (jammu and kashmir) निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि इतर लहान पक्ष आघाडी करतील, अशी चर्चा काही दिवसांपासून आहे. मात्र, अलिकडेच नॅशनल कॉन्फरन्सने स्वबळावर लढण्याचा इरादा बोलून दाखवला. इतर पक्षांमधील फाटाफूट भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (BJP getting ready for Mission Jammu and Kashmir; Meeting begin)