बारुपूर/ सिलीगुडी – नव्यानेच नियुक्त झालेल्या भाजपच्या एका सरचिटणीस पदावरील नेत्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत असभ्य आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. जर आपल्याला करोना विषाणूचा संसर्ग झाला, तर अपण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारू, असे अशोभनीय वक्तव्य भाजपचे सरचिटणीस अनुपम हाझिया यांनी केले आहे.
कोविड-19 च्या रुग्णांच्या कुटुंबीयांचे दुःख समजावे म्हणून आपण असे कृत्य करू असे ते म्हणाले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून तृणमूल कॉंग्रेसने पोलिसांकडे तक्रार केली आहे.
“भाजपचे कार्यकर्ते करोनापेक्षाही भयंकर शत्रूशी लढत आहेत. ते ममता बॅनर्जींशी लढत अहेत. जर मास्क न वापरता ममता बॅनर्जी यांच्याशी लढता येत असेल. तर मास्क न घालता करोनाशीही लढता येऊ शकेल.’ असे हाझिया म्हणाले होते. याचवेळी बोलण्याच्या ओघात त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत वरील आक्षेपार्ह वक्तव्य केले.
करोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांवर ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात आहेत, ते दयनीय आहे. हे मृतदेह केरोसीन टाकून जाळून टाकले जात आहेत. मृत व्यक्तींच्या मुलांना अंत्यदर्शनही घेऊ दिले जात नाही. मेलेल्या कुत्र्या-मांजरांबाबतही असे वागले जात नसते, असेही ते म्हणाले.
हाझिया हे पूर्वी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार होते. गेल्याच वर्षी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या सिलीगुडीतील कार्यकर्त्यांनी रॅली काढून हाझिया यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र हाझिया यांच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. अशाप्रकारचे वक्तव्य टाळायला हवे, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे.