उत्तर प्रदेशात भाजपकडून ब्राह्मणांची जमवाजमव?

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात त्या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये खदखद असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून कानावर येते आहे. अशातच करोनाची स्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दलही योगी यांचे सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही टीकेचे धनी ठरले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर योगींना हटवले जाण्याच्या चर्चा असतानाच योगींनी आज दिल्लीला धाव घेतली.

योगी आज गृहमंत्री अमित शहा यांना भेटले तर उद्या ते सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटणार असल्यामुळे संबंधित चर्चांना पुष्टीच मिळाली. मात्र योगींना हटवण्याचा कोणताच इरादा नसल्याचे व पक्षात सगळे काही ठिकठाक असल्याचे संकेत भाजपच्या गोटातून देण्यात आले आहे. मात्र त्याचसोबत आता आणखी एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे राज्यात भाजपकडून ब्राह्मणांची जमवाजमव केली जात असल्याची.

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी दलितांचे राजकारण करताना दशकभरापूर्वी सामाजिक अभिसरणाचा प्रयोग करत ब्राह्मण समाजाला आपल्या बाजूने घेत राज्यात स्वबळावर सत्तेवर येण्याचा चमत्कार दाखवला होता. दोन लोकसभा निवडणुका आणि एका विधानसभा निवडणुकीत भाजपनेही तोच चमत्कार करून दाखवला. मात्र त्यामागे मोदी लाटेचे कारण होते.

मोदी यांची लोकप्रियता आणि स्वत: उत्तर प्रदेशातूनच लोकसभेवर जाण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय या बाबी भाजपच्या उत्तर प्रदेशातील वादळी विजयाला हाताभार लावणाऱ्या ठरल्या. मात्र गेल्या सात ते आठ वर्षांत येथे ठाकूरांचे वर्चस्व वाढत चालल्याचे आणि भाजपचा पारंपरिक मतदार राहीलेला ब्राह्मण समाज अस्वस्थ असल्याच्या बातम्या कानी येत होत्या. त्यामुळे योगी आणि पर्यायाने मोदी सरकारच्या लोकप्रीयतेला ओहोटी लागण्याची भिती भाजप आणि त्यांची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही वाटू लागली आहे. त्यामुळे मध्यतंरी म्हणजे गेल्याच आठवड्यात संघाने भाजप नेत्यांचे बौध्दिक घेतले. त्यानंतर जे काही आता घडते आहे, त्यामागे एक निश्‍चित रणनिती असल्याचे मानले जाते आहे.

जितिन प्रसाद या कॉंग्रेसमधील एका ब्राह्मण नेत्याने कालच भाजपमध्ये प्रवेश केला. समाजात जितिन यांचे व त्यांच्या पूर्वजांचे बडे प्रस्थ असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जितिन हे उत्तर प्रदेशात भाजपचा ब्राह्मण चेहरा ठरणार आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी निवृत्त नोकरशहा ए. के. शर्मा यांचाही सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे. ते पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्याकडेही मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्‍यता वर्तवली जाते आहे.

एकूणच भाजपच्या या हालचाली त्यांनी उत्तर प्रदेशातील पडझड रोखण्यासाठी आणि आपला गड शाबूत ठेवण्यासाठीच सुरू केल्याचे दिसते. 2024 च्या निवडणुकीत पुन्हा दिल्ली काबिज करायची असेल तर उत्तर प्रदेशात स्तिती भक्कम असणे आवश्‍यक नव्हे तर अपरिहार्य असल्यामुळेच भाजपने फेरजुळणी सुरू केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.