सत्तेसाठी भाजप हपापलेला – जयंत पाटील

भाजपचे 14 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा

मुंबई – सत्तेसाठी भाजप हापापलेला आहे. सत्तेत कधी जाऊन बसतो याची स्वप्न भाजप पाहात आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वप्नरंजन चालू आहे. जे या पक्षाचं नेतृत्व करताहेत त्यांना आपलं सरकार लवकरच येणार आहे, अशा आवया उठवाव्या लागतात. तोच हा प्रकार आहे, असा टोला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचे सगळे मनसुबे उधळले जात आहेत. त्यातच जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला.

विधिमंडळ आवारात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसच्या 8-10 आमदारांना गळाला लावण्याचे भाजपचे ऑपरेशन ब्लू लोटस फसले. दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपचे 13-14 आमदार संपर्कात आहेत. त्यांचे आमच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांची कामे आम्हाला करावी लागतात, असा दावा केल्याने भाजप वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

त्यांच्याशी आमचे जुने संबंध असल्याने त्यांची कामे आम्हाला करावी लागतात. त्यांची मानसिकता आम्हाला जवळून कळलेली आहे. तरीही अशा प्रकारे पक्ष फोडणे योग्य नाही याची महाराष्ट्राने नोंद घेऊन भाजपला धडा शिकवलेला आहे. ती चूक करण्याची आमची इच्छा नाही. सरकार टिकवणे याकडे आमचे जास्तीत जास्त लक्ष आहे, असे पाटील म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.