बलिया (यूपी) – निवडणूक आचारसंहिता आणि कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल आणि रहदारीला अडथळा आणल्याबद्दल उत्तर प्रदेशचे भाजपचे बंडखोर आमदार सुरेंद्र सिंह यांच्यासह एक हजारांहून अधिक लोकांविरुद्ध आज एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भाजपने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली आहे.
पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अशोक मिश्रा यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सिंह यांच्यासह सहा जणांची नावे आहेत, तर उर्वरित अज्ञात आहेत. भाजपने बैरिया मतदारसंघातून आनंद स्वरूप शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. बलिया जिल्ह्यातील या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. सुरेंद्रसिंह यांनी भाजपच्या विरोधात बंडखोरी केल्याने येथील निवडणुकीत भाजपपुढे मोठीच आव्हानाची स्थिती निर्माण झाली आहे.