थिरुवनंतपुरम – आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले सर्व बळ पश्चिम बंगाल हस्तगत करण्यासाठी लावले आहे. मात्र, दक्षिणेकडील छोटेखानी राज्य असलेल्या केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व आजही कायम आहे. भाजपाला दक्षिणी राज्यांत कर्नाटकव्यतिरिक्त फारसे यश मिळालेले नाही. शिवाय दक्षिण भारतातील मतदारांसाठी आजही भाजपा ही “उत्तर भारतीयांची पार्टी’ असल्याचा समज दृढ आहे.
अशातच केरळमधील भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार “मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांना त्यांच्या पक्षाला आगामी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळण्याची आशा आहे. अगदी स्पष्ट बहुमत नाही मिळाले तरी भाजपा राज्यात “किंगमेकर’च्या भूमिकेत दिसेल, असे श्रीधरन यांना वाटते आहे. केरळमध्ये आजवर भाजपाला साधे अथवा लक्षणीय यश कधीही मिळालेले नसताना श्रीधरन यांचे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे.
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच पलक्कडम जिल्ह्यातील मालामपुझ्झा येथे एक रोड शो केला. या रोड शोमध्ये श्रीधरनही सहभागी झाले होते. या रोद शोला मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता, असे श्रीधरन सांगतात. कम्युनिस्ट राजवटीला आणि दंडेलशाहीला सामान्य माणूस वैतागला असून आता त्यांना खुल्या वातावरणातले सरकार हवे आहे, असे श्रीधरन सांगतात.
BJP has got very good prospects of winning number of seats according to me. It may be absolute majority or could be a sizeable number by which they'll be the kingmakers: BJP's candidate & 'Metro Man' E Sreedharan #KeralaElections2021 pic.twitter.com/7lfLeo9ysK
— ANI (@ANI) March 25, 2021
केरळ विधानसभेला “नियमसभा मंदिरम्’ या नावाने ओळखले जाते. कमाल 140 जणांच्या सदनामध्ये 67 सदस्य कम्युनिस्ट पक्षाचे असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिनरई विजयन हे मुख्यमंत्री आहेत. तर कॉंग्रेसचे (21 आमदार) रमेश चेन्निथला हे विरोधी पक्षनेते आहेत. येथे भाजपाचा अवघा एक आमदार असून आता ई. श्रीधरन यांना भाजपाला पूर्ण बहुमताची आशा आहे. त्यामुळेच त्यांचे ट्वीट सर्वाधिक चर्चेत आहे.