भाजप पश्‍चिम बंगालची संस्कृती संपवतय : राहुल गांधी

गोलपोखोर, (पश्‍चिम बंगाल) – पश्‍चिम बंगाल “सोनार बांगला’ अर्थात सोनेरी बंगाल केला जाईल, असा दावा जरी भारतीय जनता पक्षाकडून केला जात असला तरी या पक्षाकडून भाषा धर्म, जात आणि वंशाच्या आधारावर केवळ द्वेष, हिंसाचार पसरवला जात आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केला. पश्‍चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी आज प्रथमच प्रचारसभा घेतली.

राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केली. तृणमूल कॉंग्रेस पार्टी प्रमाणे भाजप आणि संघाबरोबर आपल्या पक्षाने कधीही आघाडी केलेली नाही असे ते म्हणाले. तृणमूल कॉंग्रेस भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झाली होती, त्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी ही टीका केली.

भाजपला बंगालची संस्कृती, वारसा आणि स्वतंत्र अस्मिता संपवायची आहे. आसाममध्ये आणि तामिळनाडूमध्येही पूर्वीचा सहकारी पक्ष द्रमुक बरोबर भाजप तेच करत आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणे आणि विभाजनवादी राजकारणाशिवाय भाजप काहीही करू शकत नाही असे राहुल गांधी म्हणाले. भाजपने “सोनार बांगला’ निर्माण करण्याची घोषणा केली आहे. पण हेच स्वप्न प्रत्येक राज्यात दाखवले जात आहे.

पश्‍चिम बंगालने तृणमूल कॉंग्रेसला संधी दिली मात्र तो पक्षही अपयशी ठरला. येथील नागरिक अजूनही रोजगाराच्या शोधात आहे. नोकरीसाठी येथे पैसे द्यावे लागतात. तृणमूल कॉंग्रेसकडून “खेला होबे’ अशी घोषणा केली आहे. पण जनतेची सेवा करणे आणि खेळ करणे एकच नाही असे राहुल गांधी म्हणाले.
कॉंग्रेसने कधीही भाजपा किंवा संघाबरोबर आघाडी केलेली नाही. कॉंग्रेसची लढाई फक्त राजकीय नाही तर वैचारिक आहे. कॉंग्रेस कधीही शरण येणार नाही हे भाजपला माहित आहे. म्हणूनच भाजपने कॉंग्रेस मुक्त भारत अशी हाक दिली आहे. तृणमूल मुक्त भारत अशी हाक दिलेली नाही, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.