जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यालयाबाहेर भव्य जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी मतांच्या टक्केवारीनुसार भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला, असा दावा केला.
काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
“नवरात्रीचा सहावा दिवस आहे. देवीच्या प्रार्थनेचा दिवस आहे. देवी वाघावर विराजमान आहे आणि देवीच्या हातात कमळ आहे. देवी आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे. अशा पवित्र दिवशी हरियाणात सलग तिसऱ्यांदा कमळ फुललं आहे. गीताच्या भूमीवर सत्य, विकास आणि सुशासनची जीत झाली आहे. प्रत्येत जाती आणि वर्णाच्या लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे.
भारताच्या लोकशाहीची जीत आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांच्या आघाडीला जास्त जागा दिल्या आहेत. मी त्यांनाही शुभेच्छा देत आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर जम्मू-काश्मीरमध्ये जेवढे पक्ष निवडणूक लढत होते त्यामध्ये मतांच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे”, असा मोठा दावा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.