भाजपच्या देणग्या कॉंग्रेसपेक्षा 16 पट जास्ती

2016 ते 18 दरम्यान तब्बल 900 कोटींपेक्षाही जास्त देणग्या

नवी दिल्ली – भाजपला 2016 ते 2018 दरम्यानच्या दोन वर्षात मिळालेल्या देणग्या याच काळात कॉंग्रेसला मिळालेल्या देणग्यांपेक्षा तब्ब्ल 16 पट जास्त आहेत. या कालावधीमध्ये भाजपला 1,500 उद्योजकांकडून तब्बल 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आहेत, असे एका अहवालातून समोर आले आहे. “द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने राजकीय पक्षांना 2016 ते 2018 दरम्यान उद्योजकांकडून मिळालेल्या देणग्यांचे पद्धतशीरपणे विश्‍लेषण केले आहे.

“एडीआर’च्या अहवालानुसार 2016 ते 2018 या कालावधीत राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी 93 टक्के म्हणजे 985.18 कोटींच्या देणग्या विविध उद्योगांकडून दिल्या गेल्या. राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख 6 राजकीय पक्षांपैकी भाजपला 1,731 उद्योगांकडून सर्वाधिक 915.596 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ कॉंग्रेसला 151 उद्योजकांकडून 55.36 कोटी अणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला 23 उद्योजकांकडून 7.737 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.

आपल्या पक्षाला 2004 पासून स्वेच्छेने 20 हजार रुपयांपेक्षा अधिक कोणतीच देणगी मिळाली नाही, असे बसपाने म्हटले आहे. तर एकूण देणग्यांपैकी भारतीय कम्युनिस्ट पार्टीला केवळ 2 टक्के रकमेइतक्‍या देणग्या मिळाल्या होत्या.

2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षांमध्ये 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांपैकी भाजपला उद्योजकांकडून मिळालेल्या देणग्यांचे प्रमाण 94 टक्के आणि कॉंग्रेसच्या देणग्यांचे हेच प्रमाण 84 टक्के इतके आहे. 2012-13 आणि 2017-18 या दरम्यान भाजपला उद्योजकांकडून तब्बल 1,621.40 कोटींच्या देणग्या मिळाल्या. ही रक्कम या सहा वर्षात उद्योजकांच्या एकूण देणग्यांच्या 83 टक्के इतकी आहे.

2004-05 ते 2011-12 दरम्यान आणि 2016-17 आणि 2017-18 मध्ये राष्ट्रीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये 160 पट वाढ झाली आहे. मात्र 2012-13 ते 2017-18 दरम्यान याच देणग्यांचे प्रमाण तब्बल 414 पटींनी वाढले आहे. 2015-16 मध्ये या प्रमाणात अचानक घट झाली होती. 2016-17 ते 2017-18 मध्ये उद्योजकांकडून राष्ट्रीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये 25 टक्के घट झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.