भाजप दहशतवादाविरोधात लढण्याचे केवळ ढोंग करत आहे- नवाब मलिक

मुंबई: शहीद हेमंत करकरे यांचा आज अवमान झाला. मालेगांव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रग्यासिंह यांनी तो केला. त्यावर गांधी भवन, तन्ना हाउस येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. साध्वी प्रग्यासिंह यांच्या विधानाचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, “ईदला मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. काहींना यात अटक झाली. हेमंत करकरे यांच्याकडे या केसच्या तपासाची जबाबदारी होती. त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केले. त्यात साध्वी प्रग्यासिंह ठाकूर यांचे नाव आले होते. अभिनव भारत या संघटनेचेही यात नाव होते. सरसंघचालक यांची हत्या करण्याचाही कट या संघटनेने रचला होता. या संघटनेवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजप आणि संघानेच केली होती.”

साध्वी प्रग्यासिंह यांच्याबद्दल ते पुढे म्हणाले, “साध्वी प्रग्यासिंह यांना जामीन मिळाला आहे मात्र त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. असं असताना देखील भाजपा साध्वी प्रग्यासिंह यांना उमेदवारी देत असेल तर त्याचा अर्थ भाजप दहशतवादाचे समर्थन करत आहे. भाजप दहशतवादाविरोधात लढण्याचे केवळ ढोंग करत आहे. शहिदांचा अपमान करण्याचे काम करत आहेत. जनता यांना क्षमा करणार नाही, जनतेने भाजपला धडा शिकवावा, भाजपला आता या संदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी या घटनेचा जाहीरपणे तीव्र निषेध करत आहे.”

नवाब मलिक यांच्यासह या प्रेस कॉन्फरन्सला राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राजू वाघमारे, राष्ट्रवादीचे संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो हेही उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.