तामीळनाडू : भाजपने अद्रमुककडे मागितल्या 25 जागा

चेन्नई – निवडणूक आयोगाने तामीळनाडूसह अन्य राज्यांमधील विधानसभांच्या निवडणूकांची घोषणा केल्यावर स्थानिक पातळीवर आघाडीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. तामीळनाडूमध्ये अद्रमुक आणि द्रमुक या प्रमुख पक्षांमध्ये होत असलेल्या या निवडणूकीदरम्यान भाजपने अद्रमुककडे आघाडीसाठी हात पुढे केला आहे. 

तामिळनाडूमधील जी. किशन रेड्डी, एल. मुरुगन आणि सी. टी. रवी यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांनी अण्णाद्रमुकच्या नेत्यांशी चर्चा केली आणि भाजपला किमान 25 जागा देण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला भाजपने 40 जागा मागितल्या होत्या. त्यामुळे आता त्यांची मागणी कमी झाली असल्याचे दिसते आहे. परंतु, मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे या संदर्भात गृहमंत्री अमित शहा जेंव्हा चेन्नईला भेट देतील तेंव्हा त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत, असे मानले जाते आहे.

अभिनेते कमल हासन यांना कॉंग्रेसमध्ये सामील होण्याविषयी विचारले गेले, तेव्हा त्यांनी अगदी संदिग्ध उत्तर दिले. त्यामुळे कॉंग्रेस आणि मक्कल निधी मयम अर्थात “एमएनएम’ पक्षात आघाडी होण्याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे. अभिनेते सारथकुमार यांच्या अखिल भारतीय समथुवा मक्कल कच्चीने मक्कल निधी मैयमचे संस्थापक कमल हासन यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यामुळे तामीळनाडूत तिसऱ्या आघाडीची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. अद्रमुकने आपल्या पक्षाला चर्चेसाठीही बोलावले नाही, असा दावा सारथकुमार यांनी केला आहे. आता द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भाग असलेले इंडिया जनायका काच्चीचे नेते देखील “एमएनएम’शी आघाडीसाठी वाटाघाटी करत आहेत. या आघाडीमध्ये कमी जागा पदरात पाडून घेण्याची त्या पक्षाला आशा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.