भाजपनेच घडवला पंकजाताईंचा पराभव

वंजारी समाजबांधवांचा आरोप:समाज नेतृत्वहीन झाल्याची भावना 

पुणे: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. परळी मतदारसंघातून मताधिक्य मिळवत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे. तर पंकजा यांना पराभूत करण्यासाठी भाजपातूनच रसद पुरविण्यात आली असल्याचा आरोप वंजारी समाजाचे नेते करत आहेत. पंकजा यांचा पराभव वंजारी समाजाला पचलेले नसून त्यामुळे समाजात नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील ४० पेक्षा अधिक मतदार संघात निर्णायक मताधिक्य असणाऱ्या वंजारी समाजाकडे भाजपने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप वंजारी समाजाकडून करण्यात येत आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे जवळपास ७० टक्क्याहून अधिक वंजारी समाज हा पारंपरिक भाजपचा मतदार असून, तरी देखील भाजपने वंजारी समाजातील फक्त एकाच उमेदवाराला उमेदवारी दिली, त्यांचाही भाजपनेच पराभव केला असल्याची चर्चा सर्वत्र रंगताना पाहायला मिळतेय.

तर राष्ट्रवादीने पाच वंजारी उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यापैकी धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड हे दोन उमेदवार निडून आले आहेत. तसेच शिवसेनेतुन देखील कांदे आणि बांगर हे दोन वंजारी उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने वंजारी समाजाचे नेतृत्व छाटण्यासाठीच जाणीवपूर्वक उमेदवारी दिली नसल्याचा आरोप वंजारी नेत्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान निवडणुकांपूर्वी बीड जिल्ह्यात “लोकांच्या मनातील मुख्यमंत्री” असे फलक झळकले होते. त्यानंतर या संदर्भात बोलताना पंकजा यांनी “हे माझं मत नसून लोकांच्या भावना आहेत” असे स्पष्टीकरण दिले होते. त्याच भीतीमुळे भाजपने पंकजा यांचा पराभव केला असल्याची चर्चा सध्या वंजारी समाजात सुरु आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.