उमेदवारीच घोंगड घालून भाजपने फसवल- जाणकार

मुंबई: भाजपने युतीच्या मित्र पक्षाला १४ जागा सोडल्या आहेत. परंतु त्यातील बहुतांश ठिकाणी मित्र पक्षांच्या उमेदवारांना भाजपच्या चिन्हांवरच निवडणूक लढवायला लावली आहे. त्यामुळे उमेदवारीच घोंगड घालून भाजपने फसवल असल्याच मत रासपचे प्रमुख महादेव जाणकार यांनी व्यक्त केलं आहे.

ते म्हणले की जिंतूर आणि दौंड ही जागा महायुतीमध्ये रासपला सोडण्यात आलेली असताना त्याजागी भाजपाने उमेदवारांना एबी फॉर्म देऊन कमळ चिन्हावर लढण्यास भाग पाडले. त्यामुळे रासपच्या सर्व कार्यकर्त्यांचे संतुलन बिघडलं आहे, मलादेखील या निर्णयाने वाईट वाटलं. ज्यांनी भाजपाचे एबी फॉर्म घेतले ते राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांची रासपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी आश्वासन देऊनही भाजपने मला फसविले असल्याची खंत जाणकारांनी व्यक्त केली आहे.

जाणकार पुढे म्हणले, रासप कायमच भाजप सेनेसोबत राहणार आहे. दौंड आणि जिंतूर बद्दल काय करायचं तो निर्णय कार्यकर्तेच घेतील. उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं होतं की, मित्रपक्षांना भाजपाने जागा दाखविली, ते योग्य आहे.

शिवसेनाही जात्यात आहे, मी पण भरडला जातोय, राहुल कुलने माझ्यासोबत गद्दारी केली. चांदा ते बांदा माझी कार्यकर्त्यांची फळी आहे. वेळ निघून गेली आहे. आता गंगाखेडची एकमेव जागी रासपचा उमेदवार निवडणूक लढविणार आहे असं त्यांनी सांगितले. तसेच उपेक्षित समाजच्या हितासाठी आम्ही युती सोबतच राहणार आहोत. असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.