मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतीत खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय “न्याय’ करत आहेत, ते संपूर्ण महाराष्ट्र पहातो आहे. आधी मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा राज्याची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससह आणि शरद पवार यांना लगावला आहे.
बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्याविरोधात विरोधकांनी रान उठवलं आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी राज्यभरात आंदोलन करणार आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात सावध भूमिका घेतल्याने भाजपाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि अतिरिक्त आयुक्त कर्णिक, ज्योत्स्ना रासम यांची बैठक घेतली. यात एका आठवड्यात धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करावी अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुंबई पोलीस सहा आठवड्यांच्या चौकशीनंतर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी पूर्ण व्हावी असं मत गृहमंत्र्यांनी मांडलं. त्यामुळे आणखी एक आठवडा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम राहणार आहे.
आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा केली आहे, त्याचसोबत त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप झाले आहेत, वेगळ्या विचारांचे, वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, असे आपण सुचवले आहे. आता हे प्रकरण पोलिसांकडे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं शरद पवारांनी सांगितले.