पुणे – विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राज्यात महाजनादेश यात्रा काढली आहे. ती दि. 14 आणि 15 सप्टेंबर रोजी पुण्यात येणार असून त्या नियोजनासाठी शहर भाजपने बोलवलेल्या बैठकीस भाजपच्या 50 टक्के नगरसेवकांनी दांडी मारली.
दरम्यान, ही यात्रा दोन दिवस शहरात असणार असल्याने यात्रेला राज्यातील सर्वाधिक प्रतिसाद पुण्यातून मिळेल, यासाठी प्रत्येक नगरसेवकाने यात्रेच्या मार्गातील एक चौक घेऊन तेथे शक्तिप्रदर्शन करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
भाजपची ही महाजनादेश यात्रा 14 सप्टेंबर रोजी पुण्यात येणार असून हडपसर विधानसभा मतदारसंघातून ती सुरू होणार आहे. त्यानंतर ती स्वारगेट-पर्वती, कसबा, कोथरूड, शिवाजीनगर मधून कॅन्टोंन्मेटमधून वडगावशेरीकडे जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर रोजी ही यात्रा दांडेकर पूल येथून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भोर विधानसभा मतदारसंघासाठी खेड-शिवापूरकडे रवाना होणार आहे.
या नियोजनासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी यात्रेचे नियोजन तसेच मार्गांची माहिती दिली. तसेच शहरात भाजपचा एक खासदार, आठ आमदार तसेच 100 नगरसेवक असल्याने जास्तीत जास्त शक्ती प्रदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, या बैठकीस भाजपच्या 50 टक्के नगरसेवकांनी गणेशोत्सवाचे कारण देत दांडी मारल्याचे दिसून आले.