ठाणे – ठाणे महापालिकेचा कारभार पारदर्शक नाही त्यामुळे आम्ही महापालिकेच्या करोना रिलिफ फंडास निधी देणार नाही, अशी भूमिका ठाण्यातील भाजप नगरसेवकांनी घेतली आहे. त्या महापालिकेतील अन्य पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मात्र पाच लाखांचा निधी दिला आहे, पण भाजप नगरसेवकांनी मात्र त्यास नकार दिला आहे.
महापौरांना पाठवलेल्या पत्रात भाजपचे मनपातील नेते संजय वाघुले यांनी म्हटले आहे की, करोना मदतीच्या महापालिकेच्या कारभारात कोणतीही पारदर्शकता बाळगली गेलेली नाही. त्यामुळे आम्ही या निधीला मदत देणार नाही. महापालिकेतर्फे एक हजार बेडची कोविड ट्रिटमेंट सुविधा उभारली जात आहे, त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजप नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.
भाजपच्या या आक्षेपाला उत्तर देताना महापौरांनी म्हटले आहे की, महापालिकेतर्फे करोना मदत निधी स्थापन करण्याच्या प्रस्तावाचे भाजपने स्वागत केले होते, पण आता प्रत्यक्ष मदत देताना मात्र त्यांनी घुमजाव केले आहे. ठाण्यातील महापालिकेच्या 131 सदस्यांच्या सभागृहात भाजपचे 23 नगरसेवक आहेत.