भाजप नगरसेवकाची डॉक्‍टरांना धक्काबुक्की

डॉक्‍टरांचे आंदोलन – मृत महिलेला आयसीयूत ठेवत असल्याचा नगरसेवकाचा आरोप
पिंपरी (प्रतिनिधी) –
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रात्री दीड वाजता डॉक्‍टर व नगरसेवक यांच्यामध्ये वाद झाला. त्यामध्ये भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी डॉक्‍टरांना दमदाटी करत धक्काबुकी केली. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टरांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला. जोपर्यंत आम्हाला काही संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही असा पवित्रा या डॉक्‍टरांनी घेतला आहे.

वायसीएम रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. येथे सातशे खाटांची क्षमता असून त्या ठिकाणी करोनाची तीव्र लक्षणे असलेले व अत्यवस्थ रुग्णांना ठेवण्यात येत आहे. बाकीच्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येते. रुग्णालयात जागा कमी असल्याने येथे फक्त तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांनाच ठेवण्यात येते.

बाकीच्या रुग्णांनाही वायसीएममध्ये भरती करून घेण्याचा नातेवाईकांचा आग्रह असतो. त्यामुळे नातेवाईक व रुग्णालय प्रशासन यांच्यामध्ये अनेकदा बाचाबाची होत असते. त्यामध्येच रात्री दीड वाजता नगरसेवक संदीप वाघेरे यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. एका ज्येष्ठ महिलेचा रात्री करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांसह नगरसेवकही त्याठिकाणी पोहचले. तेथे गेल्यावर त्या महिला अजून जीवंत असून त्यांना आपण आयसीयू मध्ये शिफ्ट करू असे डॉक्‍टरांनी सांगितले.

मात्र महिला मृत झालेली असतानाही तुम्ही तुमचे अपयश लपविण्यासाठी त्यांना आयसीयूत ठेवणार का असा प्रश्‍न नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला. यावरून डॉक्‍टर व वाघेरे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली.यावेळी नगरसेवक वाघेरे यांनी डॉक्‍टरांना धक्काबुकी केली. तसेच बाजूला ठेवलेल्या स्ट्रेचरवर लाथा मारत आम्हाला शिवीगाळ केली असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.

मी मारहाण कोणाला केली नाही. मला पण समजत ते डॉक्‍टर आहेत. मृत झालेल्या महिलेला ते आयसीयूमध्ये ठेवण्यास निघाले होते. यावरून थोडासा वाद झाला. मात्र मारहाण वैगरे असे काहीही झाले नाही. डॉक्‍टर खोट सांगत आहेत.
– संदीप वाघेरे, नगरसेवक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.