सांगली – सांगलीत भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीतर डोक्यात सुद्धा दगड घातला. जत मधील सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूलजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विजय ताड असे हत्या करण्यात आलेल्या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जत नगरपालिकेतील भाजप नगरसेवक विजय ताड हे आपल्या वाहनातून सांगोला रोडवरील असणाऱ्या स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. याप्रसंगी अल्फान्सो स्कूलच्या जवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर बेझूट गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निघृण हत्या केली. यात ताड यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला, हे मात्र समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. तसेच ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठे गर्दी केली आहे, तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत. खुनाचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.