पुणे – गेल्या काही दिवसांपासून भाजप-कॉंग्रेस यांचे सोशल मिडियावर “वॉर’ सुरू होते. मात्र, हा वाद चव्हाट्यावर म्हणजे रस्त्यावर आला. कॉंग्रेसभवनचा इतिहास सांगणारी पुस्तिका देण्यासाठी भाजप कार्यालयात गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले.
दोन्ही पक्षांची सत्ता असताना त्यांनी शहरात काय काय कामे केली याविषयी सोशल मिडियावर शाब्दिक “वॉर’ सुरू होते. त्यावेळी कॉंग्रेसने पुणे शहरात कॉंग्रेसभवनाचा महाल बांधण्याशिवाय दुसरे काही केले नाही, अशी टीका करण्यात आली होती. त्यामुळे युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसभवनचा इतिहास सांगणारी आणि माहिती देणारी पुस्तिका भाजप शहराध्यक्षांना देण्याचा निर्णय घेतला, ते निघालेही. भाजप शहर कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर पोलीसांनी त्यांना रोखले.
तुम्ही सगळे जाण्यापेक्षा आम्ही तुमच्या प्रतिनिधीची भेट घालून देतो असे सांगून, कार्यकर्त्यांना परत पाठविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन यांनी सांगितले. आम्ही कसलेही आंदोलन करणार नव्हतो, केवळ कॉंग्रेस भवनचा इतिहास सांगणारी माहितीपुस्तिका देणार होतो, असे जैन म्हणाले. हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिकांसाठी कॉंग्रेसभवन हे एक आश्रयस्थान होते. नारायण दाभाडे यांनी कॉंग्रेस भवनाच्या परिसरात स्वतःच्या अंगावर इंग्रजांकडून गोळ्या झेलल्या आणि देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या वास्तू बद्दल बोलणे म्हणजे, स्वातंत्र्यसेनानींचा अपमान हा भाजपने केला आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.