पुणे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुन्हा जीभ घसरली आहे. पवारांवर टीका करताना दुसऱ्यांदा त्यांच्याकडून बापाचा उल्लेख करण्यात आलाय. दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांना उद्देशून आम्ही तुमचे बाप आहोत. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता आज ट्रॅक्टर रॅलीनंतर सभेत बोलताना यांच्या बापाची पेंड आहे का ? असं..चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आणि पवारांना उद्देशून अप्रत्यक्षपणे टीका करताना पुन्हा एकदा बापाचा उल्लेख केला.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1356040818068953/
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी बळीराजा सन्मान आणि ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन आज भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पुणे येथे करण्यात आले होते. त्यानिमित्त आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला भव्य ट्रॅक्टर यात्रा काढण्यात आली. वरवंड येथून निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप चौफुला या ठिकाणी झाला आणि तिथं या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये झालं. सभेत भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा पवारांवर टीका केली.
सभेत भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने कृषी विधेयकांच्या अंमलबजावणीला दिलेल्या स्थगिती बद्दल राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या जर चांगल्या असतील, तर शेतकरी तिथे आपला माल विकू शकतो. मात्र केवळ सेझ गोळा करणे, पगार घेणे आणि ठेकेदारांचा फायदा करून देणे, एवढचं बाजार समित्यांचं काम आहे. पण, शेतकऱ्यांकडून फक्त सेस गोळा करण्यासाठी या विधेयकाला विरोध होत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले,कृषी विधेयक कायदे हे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी आणणारे कायदे आहेत. शेतकरी आता आपले उत्पन्न बाजारातही विकू शकतो आणि बाजाराच्या बाहेर देखील विकू शकतो. कृषी विधेयक कायद्याला महाराष्ट्रात फारसा विरोध नाही, पण राज्य सरकारने कृषी विधेयकांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप या स्थगितीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असून ही स्थगिती उठवली जाईल, असा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.
मात्र ते यावरच थांबले नाहीत तर राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल असं जाहीर केलं. यांच्या बापाची पेंड आहे का ? असं.. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आणि पवारांना उद्देशून पुन्हा एकदा बापाचा उल्लेख केला.
दरम्यान, शनिवारी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पुण्यामध्ये आयोजित एका पक्षांतर्गत कार्यक्रमावेळी बोलताना पाटील यांनी, “पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांमध्ये अजित पवार यांना टोला लगावला होता.
शरद पवार हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप…
त्यानंतर पवारांवरील पुण्यात केलेल्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं होतं. अमोल मिटकरी म्हणाले होते, भाजपाच्या एका महाशयाने, “आम्ही तुमचे बाप आहोत” असे वक्तव्य केले. त्यांच्या माहिती करता 2019 चे विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 2022 साली पुणे मनपात पुण्याची जनता अजित दादा पवार हे तुमचे बाप आहेत हे सिद्ध करून दाखवेल काळजी करू नका.
त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अमोल मिटकरी यांना प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, 2022 कशाला 2024च्या विधानसभेलाही माझे ओपन चॅलेंज आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळे लढावे. आम्हीदेखील स्वबळावर लढू. मग कोणाला किती जागा मिळतात, ते पाहू, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
त्यानंतर आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे पवारांवर टीका करताना यांच्या बापाची पेंड आहे का ? असं म्हटलयं.त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील हे शाब्दिक युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.