पिंपरी – भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड, तर सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांना भाजपने भोसरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. निष्ठावंत आणि आयाराम असा वाद गेल्या काही दिवसांपासून शहरातील भाजपामध्ये उफाळला होता. गेल्या काही दिवसांपासून निष्ठावंतांनी कार्यक्रम घेत शक्तिप्रदर्शनही केले होते.
पिंपरी-चिंचवडमध्येही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा होती. मात्र विद्यमान आमदारांवरच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास व्यक्तकरत पहिल्याच यादीत दोघांचीही नावे जाहीर केली. भोसरी विधानसभा मतदार संघातून आमदार महेश लांडगे हे मागील वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी आमंत्रण असूनही भाजपचा प्रवेश टाळत सहयोगी सदस्यपद स्वीकारले होते.
विधानसभेसाठी लांडगे इच्छुक होते. मात्र, भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी गळ लावल्याने लांडगे यांनी भाजप उमेदवारीबाबत जाहीर बोलणे टाळले. अपक्ष म्हणून लढण्याची जोरदार तयारी त्यांनी केली होती.
मात्र, काल त्यांनी भाजपच्या नावाने उमेदवारी अर्ज नेला. त्यानंतर आज उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपकडून लढण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. लक्ष्मण जगताप हे गुरुवार (दि.3) रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर महेश लांडगे हे शुक्रवार (दि.4) आक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.